बारामती मध्ये जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा
राहुल चव्हाण @ प्रतिनिधी
दि.२४ एप्रिल २०२५ बारामती : मुंबईतील विलेपार्ले येथील दिगंबर जैन समाजाचे मंदीर व जिनमूर्तीची मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी बुलडोझर चालवून मंदीर जमीनदोस्त करत जिनमूर्ती व जिनशास्त्राची अवहेलना केली. या घटनेच्या निषेधार्थ बारामतीत गुरुवारी (ता. 24) निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. बारामतीकरांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवून या मोर्चाचे समर्थन केले.
गुरुवारी सकाळी महावीर पथ येथील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदीरापासून निषेध मोर्चास प्रारंभ झाला. यामध्ये सकल जैन समाज तसेच सर्वधर्मिय बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी चौक, सुभाष चौक, भिगवण चौकातून इंदापूर चौक मार्गे निषेध मोर्चा प्रशासकीय भवन येथे गेला.
बारामतीचे तहसिलदार गणेश शिंदे यांना या प्रसंगी सकल जैन धर्मियांच्या वतीने निवेदन दिले. किशोरकुमार शहा, मनोज मुथा व दिलीप धोका यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, मंगल सराफ, भारती मुथा, माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी यांच्यासह अँड. संदीप गुजर, सत्यव्रत काळे, सुशील सोमाणी, सुनिल शिंदे, अक्षय देवकाते, रवींद्र चव्हाण, सुरेंद्र जेवरे, काळूराम चौधरी, आसिफ खान, साधू बल्लाळ, शुभम अहिवळे, श्रीकांत जाधव, रमेश मोरे, जगदीश पंजाबी यांच्यासह अनेक जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'या' आहेत जैन समाजाच्या मागण्या?
विलेपार्ले येथील जैन मंदिरावर हल्ला व धर्माची विटंबना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करुन निलंबित करावे.मंदिर पूर्व स्थितीत जसे होते तसे पुन्हा त्याच जागेवर बांधून त्याचे पुननिर्माण करुन ते जैनवासियांना सुपूर्द करावे.समाजाच्या शुचितेसाठी कडक नियम करावे, जेणेकरुन पुन्हा इतरांनी जैन समाजाकडे गैर नजरेने पाहू नये व गैरवर्तन करु नये. जैन धर्मस्थळांची व साधूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी व यासाठी संबंधित अधिका-यांना सूचित करावे. जैन समाजाच्या अल्पसंख्यांक कायद्यानुसार त्यांचा सन्मान राखला जावा.