व्यवहारे कुटुंबाच्या नियोजनात शिवमहापुराण कथा यशस्वी; हजारो शिवभक्तांची उपस्थिती
गणेश म्हैसमाळे/गंगापूर :
माजी उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी आ. प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली 16 ते 22 एप्रिल दरम्यान पंडित राघव मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले. सात दिवस चाललेल्या या कथेची सांगता मंगळवारी उत्साहात झाली. सुमारे हजारो शिवभक्त उपस्थित होते.
महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांसाठी निवास, पाणी, भोजन, शौचालय, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधांची उत्तम व्यवस्था होती. मिश्रा यांनी कथेच्या समारोपात भोले शंकराच्या भक्तीचे महत्त्व, चांगली कर्मे आणि आई-वडिलांची सेवा यावर जोर दिला. त्यांनी पशुपतीनाथाची आख्यायिका सांगितली आणि लासूरच्या नियोजनाचे कौतुक केले. “डमरू बजारे लासुर के बजार मे” भजनावर भक्तांनी ठेका धरला.
आ. प्रशांत बंब, बाळूशेठ संचेती, दिनेश परदेशी, मीनाताई पांडव, प्रदिप भुजबळ यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट दिली. गणेश व्यवहारे यांनी आभार प्रदर्शनात आ. बंब, तरुण, माता-भगिनी आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले, “आईच्या इच्छेने ही कथा आयोजित केली. हजारो भाविकांना कथा श्रवणाचा आनंद मिळाला, याचे समाधान आहे. यापुढेही सामाजिक-धार्मिक कार्यक्रम करू.”महादेवाच्या आरतीने कथेची सांगता झाली आणि भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.